सातारा: फलटण येथे डॉक्टर तरुणीने सुसाईड नोट लिहून आपले जीवन संपवल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील दोषी कोणीही असो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणं, हे आपले कर्तव्य असल्याचंही उदयनराजे म्हणाले. तसंच या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असं आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर या आत्महत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांच्या कारखान्याच्या वसुलीसाठी पोलिसांचा वापर केला जात होता आणि यातूनच खोटा वैद्यकीय अहवाल देण्यासाठी सदर तरुणीवर दबाव आणण्यात आला. या दबावामुळे तिने आपलं जीवन संपवल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल विचारले असता, उदयनराजे यांनी सांगितलं की, जोपर्यंत सखोल चौकशी होऊन सत्य समोर येत नाही, तोपर्यंत कोणावरही आरोप करणं योग्य नाही. यावर अधिक बोलणे त्यांनी टाळलं.
सातारा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या घटनेचाही उदयनराजे भोसले यांनी उल्लेख केला. या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे. कोणत्याही वकिलाने त्याचे वकीलपत्र घेऊ नये. अशा लोकांना गोळ्या घालाव्यात. जनतेच्या ताब्यात द्यावं, जनतेने ठेचून मारावं, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे.
तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे?
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेतल्याने श्वास कोंडल्यामुळेच झाला, असा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालात काढण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने व घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर सध्या अटकेत असून त्यांची चौकशी केली जात आहे. तरुणीच्या मृतदेहाचे विच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो रासायनिक पृथक्करणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये मृत्यू गळफास घेतल्याने श्वास कोंडून झाला, असं नमूद करण्यात आलं आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.